विनोदी कविता - दिसता समोर खाणे
चाखून हुंगणे अन्
ढवळून ते पहाणे
नाही कसे म्हणू मी
दिसता समोर खाणे ।।ध्रु।।
नेटवर किती पाहू
रेसिपी नवनविन
एकेक बनवताना
चव ही अप्रतिम
सुख नेत्रे ना मावे
मनी हर्षाची उधाणे ।।१।।
जिन्नस मनी भरावा
मीही अधिर होई
वेगे करुनी आता
पाही रुची तयाची
जरी उदरभरण झाले
तरी रसनेलागी खाणे ।।२।।
वजनी झुकत काटा
व्यायाम का करावा
डाएटिंगचा नियम हा
धाब्यावर बसावा
वैद्यही देती सल्ला
पुरे खायचे बहाणे ।।३।।
डाएटचाच नेम
म्हणते करुन पाहू
कोबी, मुळा नि लॉकी
कच्चा कसा मी खाऊ
ना तेल, ना मसाले
वाटे नको हे खाणे ।।४।।
दिसती मलाच स्वप्नी
समोसे, वडे, खमंग
रसगुल्ले, बर्फी, रबडी
शेव -चिवड्याचा संग
कधी खाईन वाटे
काजू आणि बेदाणे ।।५।।
#सविता_सामंत_.