Ticker

6/recent/ticker-posts

दसरा स्पेशल : माझी 'लव्हलेटर्स' आणि बायको..!

सदरची कथा निव्वळ मनोरंजनासाठी पोस्ट करत आहे. दुर्दैवाने स्वानुभव नाही. 

माझी 'लव्हलेटर्स' आणि बायको..!



गणपती जवळ आले म्हणून आम्ही नवरा बायको घराची आवराआवर करत होतो. मला खरं कामाचा कंटाळा आला होता. पण, बळजबरी कामढकल करत होतो. 

आम्ही कपटातून जुन्या सुटकेस काढल्या. 

नको असलेली कागदपत्र फेकून द्यायचं ठरवलं. कागदांच्या ढिगात बसून आम्ही एक एक कागद चेक करत होतो आणि नेमकं नको तेच घडलं. 


एक पाकीट बायकोच्या हाती लागलं आणि त्यातून चिट्ट्यांचा गठ्ठाच खाली पडला. कॉलेजमध्ये असताना मिळालेली लव्हलेटर्स मी त्या पाकिटात भरून ठेवली होती. 

आई-बाबांच्या हाती लागू नयेत म्हणून सुटकेसमध्ये अगदी आतल्या कप्प्यात लपवून ठेवलेली लव्हलेटर्स पंधरा वर्षांनंतर बायकोच्या हाती लागली आणि क्षणात मला घाम फुटला.


मी त्या चिट्ट्या घेइपर्यंत बायकोनं त्यावर हात ठेवला आणि एकेक चिठ्ठी शांतपणे वाचू लागली. एकूण तेरा चिट्ट्या होत्या. 

पंधरा मिनिटं ती चिट्ट्या वाचत होती आणि मी राहून राहून शेजारची पाण्याची बाटली तोंडाला लावत होतो. फॅनचा स्पीड वाढवत होतो. कपाळाचा घाम पुसत होतो. 


सर्व चिट्ट्या वाचून झाल्यानंतर बायकोनं सगळा ढीग माझ्याकडं दिला आणि पुन्हा आवराआवर करू लागली. ती मला काहीच बोलली नाही. कमालीचा आनंद झाला. पण, कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असावी, असा विचार डोक्यात आला आणि मनावरचं दडपणही वाढलं. 


त्यानंतर मी घर झाडून घेतलं. भांडी घासली. धुणं धुतलं. फरशी पुसली. जळमटं झटकली. अगदी घरासमोरचं अंगणही झाडून काढलं. 

संध्याकाळी दोन कप चहा करून एक कप तिला दिला आणि एक मी घेतला. रम्य सायंकाळी दोघंही चहा प्यायला बसलो. न राहवून मी विषय काढलाच. 'तुला त्या चिट्ट्या वाचून माझा राग नाही आला?'


तशी ती म्हणाली, 'राग नाही आला रे, पण वाईट वाटलं.' ती तसं म्हणाल्यावर माझाही चेहरा पडला. मी म्हणालो, 'सॉरी, मला तुला दुखवायचं नव्हतं.' त्यावर ती म्हणाली, 'तसं नाही रे. पण, तू तुझ्या सगळ्या चिठ्ठया अजून जपून ठेवल्यात अन् मी माझ्या चाळीस चिट्ट्या लग्नाआधीच जाळून टाकल्या.'


असं म्हणून ती किचनमध्ये निघून गेली.

दोन दिवस झाले, मला समजंना की मी चिडायला हवं की रडायला हवं...😅😅😅

●●●●